Logo Trop1 (1)

मराठी (TROP ICSU in Marathi)

जगभरातील सर्व अभ्यासक्रमांत वातावरण-बदल शिक्षणाचा समावेश

वातावरण बदल आजच्या काळातील अत्यंत महत्त्वाच्या प्रश्न आहे

वातावरण बदल जगातील सर्व देशांच्या व तेथील नागरिकांच्या समन्यायी व धारणीय विकासास बाधक ठरत आहे

ह्यावर उपाय करण्यासाठी जनतेमधे ह्या बद्दलची जागरुकता असणे आवश्यक आहे

वातावरण बदलांमुळे होणाऱ्या दुष्परिणामांपासून बचाव करण्यासाठी उपाय स्थानिक असतील पण सार्वत्रिक विज्ञानावर आधारित असतील

वातावरण बदल शिक्षणाचा औपचारिक शिक्षणात समावेश केल्यामुळे सध्याच्या व भावी पिढ्यांमध्ये, वातावरण बदलांना सामोरे जाण्यासाठी व त्या बदलांशी जुळवून घेण्यासाठी आवश्यक असलेली लवचिकता व स्थानिक उपाय शोधण्याची कौशल्ये विकसित करणे शक्य होईल. 

टीआरओपी आयसीएसयू (TROP ICSU) (https://climatescienceteaching.org/https://tropicsu.org/) प्रकल्पाचे उद्दिष्ट शालेय व महाविद्यालयीन शिक्षणाच्या गाभ्यामधे वातावरण बदलांशी निगडित विषयांचा समावेश करून विद्यार्थ्याना वातावरण बदलांची कारणे व परिणाम यांच्याबद्दल जाणीव करून देणे असे आहे. संपूर्ण मानवतेनी त्यांच्या क्षमता, कौशल्ये आणि महत्वाकांक्षा वातावरण बदलांच्या समस्येवर केंद्रित कराव्यात ह्यासाठी ज्ञानाचे लोकशाही-करण करण्याच्या कल्पना पुढे आली आहे. टीआरओपी आयसीएसयू प्रकल्प हा त्याचाच एक भाग आहे.  

शालेय व महाविद्यालयीन शिक्षणाच्या गाभ्यामध्ये वातावरण बदलाशी निगडित विषयांचा समावेश करण्यात यावा यासाठी निवडक व विधिग्राह्य शैक्षणिक संसाधनांचा विश्वसनीय स्रोत उपलब्ध करण्या भोवती हा प्रकल्प केंद्रित आहे. असे केल्याने कुठल्याही विद्या-शाखेच्या विद्यार्थ्याना वातावरण बदलांची कारणे व परिणाम यांच्याबद्दल माहिती मिळणे शक्य होईल व वातावरण बदलाच्या सार्वत्रिक समस्येवर नवकारी स्थानिक उपाययोजना राबवण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करणे शक्य होईल. 

म्हणजेच, दर्जेदार शिक्षण (लक्ष्य ४) व वातावरण कारवाई (लक्ष्य १३) या संयुक्त राष्ट्राच्या धारणीय प्रगती लक्ष्यांशी टीआरओपी आयसीएसयू प्रकल्प संरेखित आहे. 

ह्या प्रकल्पाची लक्ष्ये गाठण्या साठी, भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था पुणे येथील टीआरओपी आयसीएसयू प्रकल्प अंमलबजावणी गटाने जगभरातील शैक्षणिक संसाधनांची तुलना करून, निवडक संसाधनांचा संग्रह विकसित करून, तो विधिग्राह्य केला आहे. वातावरण बदलांशी निगडित उदाहरणे, दाखला अभ्यास (केस स्टडी) आणि उपक्रम असलेल्या ह्या संग्रहाचा उपयोग वातावरण बदलांशी निगडित शाखा-निहाय विषय शिकवण्यासाठी होईल. शिकवत असलेल्या अभ्यासक्रमात वातावरण बदलाचे शिक्षण एकत्रित करण्याचा नवीन शैक्षणिक दृष्टिकोन ह्या प्रकल्पाने दर्शविला आहे. ह्या प्रकल्पाचा भाग म्हणून, ह्या गटाने मोठ्या संख्येने शैक्षणिक संसाधने (काहींमध्ये टप्प्या-टप्प्याने सविस्तरपणे पाठ आराखडाही आहे) विकसित केली आहेत. शालेय व महाविद्यालयीन शिक्षणाच्या गाभ्यामध्ये वातावरण बदलाशी निगडित विषयांचा समावेश करण्यासाठी हा संकल्पनेचा पुरावा (प्रूफ ऑफ कन्सेप्ट) आहे. 

अभ्यासक्रमातील विषयांशी वातावरण बदलांतील विषय सहजपणे एकत्रित व्हावेत व वैज्ञानिक दृष्ट्या ते विधिग्राह्य असावेत यासाठी सविस्तर पद्धतीने हे विषय मांडले आहेत. टीआरओपी आयसीएसयू च्या शैक्षणिक संसाधनांमुळे शिक्षकांना शिक्षणाचा दर्जा तर वाढवता येईलच, शिवाय सध्याच्या अभ्यासक्रमाला धक्का न लावता मुलांमध्ये  वातावरण बदलाबाबतची जागरुकता वाढवणे शक्य होईल.  

प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात प्रकल्प अंमलबजावणी गटाने भारत, भुतान, दक्षिण अफ्रिका, युगांडा, इजिप्त, फ्रांस, ऑस्ट्रिया, यू.के., चीन व आस्ट्रेलिया येथे शिक्षकांसाठी  कार्यशाळा घेतल्या. ह्या कार्यशाळांमधे, स्थानिक शिक्षकांनी ही शैक्षणिक संसाधने किती प्रभावी आहेत याचे मूल्यमापन केले. काही ठिकाणी वातावरण बदल ह्या विषयातील तज्ज्ञांनी उपक्रमात भाग घेऊन अभिप्राय नोंदवले. यूएनसीसी लर्न (UNCC: Learn), जागतिक हवामान विज्ञान संघटना (World Meteorological Organization (WMO)), जागतिक हवामान संशोधन कार्यक्रम (World Climate Research Programme (WCRP)) या व अश्या सारख्या संयुक्त राष्ट्राच्या संघटनांशी सहयोग प्रस्थापित केला गेला आहे. ह्या संघटनांनी पाठ आराखडा व शैक्षणिक साधने विधिग्राह्य तर केलीच पण संपूर्ण प्रकल्पाला पुष्टी दिली. प्रकल्पाच्या चमूला, १४-१५ मे २०१९ रोजी न्यूयॉर्क येथील संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात झालेल्या संयुक्त राष्ट्राच्या चौथ्या विज्ञान, तंत्रज्ञान व नविनीकरण मंच २०१९  (4th UN STI Forum 2019) येथे, त्यांच्या ह्या शैक्षणिक कामाबद्दल सादरीकरण करायची संधी मिळालि.  ११ जुलै २०१९ रोजी झालेल्या शाश्वत विकासासाठी उच्चस्तरीय राजकीय मंच २०१९ च्या “वातावरण व हवामान कारवाई विषयी दर्जेदार शिक्षणासाठी प्रणाली व पद्धती (Practices and Approaches on quality education towards environment and climate action)” ह्या सत्रातही त्यांनी आपले काम सादर केले. ह्या खेरीज ह्या चमूने पोलंड येथील सीओपी २४ व शिक्षक व वातावरण-तज्ज्ञांसाठी असलेल्या इतर कार्यशाळा व परिषदांमध्येही भाग घेतला.

जगभरात, विशेषत: तरूण मुलांमध्ये, वातावरण बदलांविषयी काळजी वाढत आहे. तसेच इटली सारख्या देशांनी वातावरण बदल हा विषय प्रत्येक मुलाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केला आहे. ह्या पार्श्वभूमीवर टीआरओपी आयसीएसयू प्रकल्पाची वेळ अगदी योग्य आहे.

टीआरओपी आयसीएसयू प्रकल्पाच्या पहिला टप्प्याला (२०१७-२०१९) आंतरराष्ट्रीय विज्ञान परिषदेच्या (International Science Council (ISC)) तीन वर्षांच्या अनुदानाद्वारे अर्थसहाय्य मिळाले आहे.

SUBSCRIBE

To Subscribe to our newsletter please enter